पदवीधर मुंबईकरांसाठी माझा चतुःसूत्री अजेंडा

12 Jun 2024 14:27:20

अ) मुंबईकरांचा रोजगार आणि कौशल्य विकास : मुंबई हे ‘रोजगाराचे शहर’ म्हणून ओळखले जाते. कोट्यवधी लोकांना मुंबई रोजगार देते. मुंबईकरांमध्ये कौशल्याची कमी नाही आणि मुंबईत रोजगाराचीही कमी नाही. गरज आहे या दोन्हीतले अंतर मिटवण्याची. त्यासाठी-

  1. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दरवर्षी रोजगार मेळावा.
  2. शासनाच्या कौशल्य विकास केंद्रातून विविध कौशल्य विकास कोर्सेससाठी आग्रह
  3. ‘वर्क फ्रोम होम’ करू इच्छिणार्‍या मुंबईकरांसाठी सोसायट्यांमध्ये कौशल्य चाचपणी शिबिरे व प्रशिक्षणाची व्यवस्था
  4. मातृभाषेतील शिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमांसाठी केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार काटेकोर अंमलबजावणीसाठी आग्रह
  5. स्टार्टअप्स, फिनटेक व उद्यमितेसाठी केंद्राच्या विविध योजना मुंबईकरांसाठी प्रभावीपणे राबविण्याचे प्रयत्न
  6. रोजगाराभिमुख ‘स्टडीसर्कल्स’ची निर्मिती व ‘नॉलेज एक्सचेंज प्रोग्राम’
  7. एशियाटिक सोसायटी लायब्ररी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांसारख्या वाचनालयांना, संस्थांना शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न.

 ब) मुंबईकरांचे आरोग्य : स्वस्थ कुटुंब, निश्चिंतपणे काम करणारा मुंबईकर, कर्ता-सवरता मुंबईकर चांगल्या मानसिक स्वास्थ्याच्या आधारे उत्तम काम करून, आपले कुटुंब सन्मानाने सांभाळू शकतो. त्यासाठी प्राथमिक स्तरावरच आजारांशी लढा देणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी-

  1. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे महापालिकेचे दवाखाने व रुग्णालयांच्या माध्यमातून प्राथमिक स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका व शासनाच्या आरोग्य विभागासह जागतिक व स्थानिक कॅन्सरसंदर्भात काम करणार्‍या विश्वसनीय संस्थांची मदत घेणे.
  2. मधुमेह, ताणतणाव यांसारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांचे स्क्रिनिंग व समुपदेशन.
  3. उत्तम आरोग्य सुविधा हा मुंबईकरांचा हक्क आहे. महापालिका व शासकिय दवाखान्यांमध्ये मिळणार्‍या सुविधा जनसामान्यांना उत्तरदायी असल्या पाहिजेत. त्यांना मिळणार्‍या सेवांबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवावी, यासाठी प्रत्येक ठिकाणी क्यूआर कोडची व्यवस्था.
  4. आरोग्याचा संबंध मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेशीही आहे. आपल्या सफाई कर्मचार्‍यांचे व सोसायटीतील घनकचर्‍याच्या व्यवस्थापनाचे नीट नियोजन केले, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले, तर आरोग्याचा प्रश्न प्राथमिक स्तरावरच सोडवला जाऊ शकतो. लहानमोठ्या साथीच्या आजारापासून मुंबईकरांचे रक्षण केले जाऊ शकते.

क) मुंबईचे पर्यावरण : मुंबईचे पर्यावरण हा केवळ चर्चेचा विषय नसून, पर्यावरणीय व हवामान बदलाचा मुंबईवर होणारा परिणाम रोखण्यासाठी एक ठोस कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. मुंबईचे बिघडणारे पर्यावरण हे मुंबईकरांच्या आरोग्यावर, दळणवळणावर व अर्थकारणावर गंभीर परिणाम करते. म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी-

  1. घनकचरा निर्मूलन हे मुंबईच्या पर्यावरणासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. कचर्‍यामुळे उपनगरात पसरणारी दुर्गंधी, डम्पिंग ग्राऊंडला वारंवार लागणार्‍या आगी याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने निचरा करणे आवश्यक आहे, जेणेकरून मुंबईच्या जैवविविधतेवर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखता येतील.
  2. आपले समुद्र किनारे स्वच्छ असणे, हे केवळ मुंबईकरांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर मुंबईला लागून असलेल्या जलचर व सागरी जैवविविधतेसाठी देखील तितकेच महत्त्वाचे आहे. इतकी वर्षे मुंबईच्या सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया न करता ते पाणी आपण समुद्रातच सोडत आहोत. त्यामुळे आपला समुद्र काळा दिसू लागला आहे. म्हणूनच एसटीपी प्लांट्सची दर्जेदार अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
  3. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे वरदान मुंबईला लाभले आहे. तिथल्या जैवविविधतेची काळजी घेणे व मुंबईच्या किनार्‍यावरील खारफुटी वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, लहानमोठ्या उद्यानांमध्ये भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून, त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे.
  4. मुंबईच्या पदपथांवर असलेल्या भारतीय वृक्षांची नोंदणी करणे, त्याचे वॉर्डनिहाय रजिस्टर तयार करणे, तेथील हेरिटेज वृक्षांचे संवर्धन करणे व या वृक्षांबाबतचे ’स्टेटस अपडेट’ मुंबईकरांसाठी खुले ठेवणे. यासाठी महानगरपालितेच्या उद्यान विभाग व पर्यावरण विभागाला बाध्य करणे. तसेच होर्डिंग्जमाफियांपासून या वृक्षांचे रक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे.
  5. मुंबईच्या जैवविविधतेची सखोल नोंद करून, त्यावर आधारित संशोधन-संवर्धनासाठी प्रयत्न करुन, यासंबंधी मुंबईतील विविध महाविद्यालयांशी समनव्य साधणे.
  6. 2032 नंतर सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतुकीची साधने इलेक्ट्रिक (ईव्ही) किंवा पर्यावरणपूरक इंधनावर चालणारी असावीत, यासाठीच्या धोरणनिर्मिती व अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार.


ड) मुंबईकरांना परवडणार्‍या किमतीत घरे : मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न. परंतु, घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती पाहता, बर्‍याच मुंबईकरांना आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. म्हणूनच परवडणार्‍या किमतीत मिळणारी घरे सर्वसामान्य पदवीधर मुंबईकरही सन्मानजनक पद्धतीने विकत घेऊ शकतो आणि आपल्या कुटुंबासोबत मुंबईतच राहू शकतो. त्याला मुंबईबाहेर जाण्याची गरज नाही. त्यासाठी-

  1. गरज आहे ती सुयोग्य धोरण निर्मितीची व परिणामकारक अंमलबजावणीची.
  2. पुनर्विकासामध्ये इमारतींच्या दीर्घकालीन देखभालीसाठी लागणारा निधी विकसकाकडून सुरक्षित करणे.
  3. पुनर्विकासात फ्लॅटधारकांना मिळू शकणार्‍या संभाव्य लाभांबाबत जागृती व पारदर्शकता आणणे.
  4. स्वयंपुनर्विकासासारख्या पर्यायांसाठी धोरण साहाय्य व कृती आराखडे तयार करणे.
  5. ‘रेरा’सारखे कायदे योग्य अंमलबजावणीच्या दृष्टीने व फ्लॅटधाराकांच्या हिताच्या दृष्टीने अपडेट करत राहणे.
Powered By Sangraha 9.0