मुंबईचे पर्यावरण हा केवळ चर्चेचा विषय नसून, पर्यावरणीय व हवामान बदलाचा मुंबईवर होणारा परिणाम रोखण्यासाठी एक ठोस कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. मुंबईचे बिघडणारे पर्यावरण हे मुंबईकरांच्या आरोग्यावर, दळणवळणावर व अर्थकारणावर गंभीर परिणाम करते. म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी-
- घनकचरा निर्मूलन हे मुंबईच्या पर्यावरणासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. कचर्यामुळे उपनगरात पसरणारी दुर्गंधी, डम्पिंग ग्राऊंडला वारंवार लागणार्या आगी याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने निचरा करणे आवश्यक आहे, जेणेकरून मुंबईच्या जैवविविधतेवर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखता येतील.
- आपले समुद्र किनारे स्वच्छ असणे, हे केवळ मुंबईकरांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर मुंबईला लागून असलेल्या जलचर व सागरी जैवविविधतेसाठी देखील तितकेच महत्त्वाचे आहे. इतकी वर्षे मुंबईच्या सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया न करता ते पाणी आपण समुद्रातच सोडत आहोत. त्यामुळे आपला समुद्र काळा दिसू लागला आहे. म्हणूनच एसटीपी प्लांट्सची दर्जेदार अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे वरदान मुंबईला लाभले आहे. तिथल्या जैवविविधतेची काळजी घेणे व मुंबईच्या किनार्यावरील खारफुटी वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, लहानमोठ्या उद्यानांमध्ये भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून, त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे.
- मुंबईच्या पदपथांवर असलेल्या भारतीय वृक्षांची नोंदणी करणे, त्याचे वॉर्डनिहाय रजिस्टर तयार करणे, तेथील हेरिटेज वृक्षांचे संवर्धन करणे व या वृक्षांबाबतचे ‘स्टेटस अपडेट’ मुंबईकरांसाठी खुले ठेवणे. यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभाग व पर्यावरण विभागाला बाध्य करणे. तसेच होर्डिंग्जमाफियांपासून या वृक्षांचे रक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे.
- मुंबईच्या जैवविविधतेची सखोल नोंद करून, त्यावर आधारित संशोधन-संवर्धनासाठी प्रयत्न करुन, यासंबंधी मुंबईतील विविध महाविद्यालयांशी समन्वय साधणे.
- 2032 नंतर सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतुकीची साधने इलेक्ट्रिक (ईव्ही) किंवा पर्यावरणपूरक इंधनावर चालणारी असावीत, यासाठीच्या धोरणनिर्मिती व अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार.
- मुंबईच्या शहर व्यवस्थापनात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी स्वतंत्र ई-पोर्टलची निर्मिती.